Drought : सोयाबीनच्या शेतात शासन निर्णयाची होळी file photo
जालना

Drought : सोयाबीनच्या शेतात शासन निर्णयाची होळी

शासन निर्णय फसवा असल्याचा आरोप, स्वाभिमानी आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

Holi of government decision in soybean fields

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळा संदर्भातील शासन निर्णयच फसवा असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे करपलेल्या सोयाबीनच्या शेतात सोयाबीन सह शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या घोषणां विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शासन निर्णयात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

मात्र, या उपाययोजना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुऱ्या असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केला. शेतसाऱ्यात हेक्टरी अवघी २०० रुपयांची सूट देऊन सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. करपलेल्या पिकांसाठी ही मदत आहे की शेतकऱ्यांची थट्टा असा सवाल जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी उपस्थित केला. शासन निर्णयात कर्जवसुलीस स्थगिती आणि कर्जाचे पुनर्गठन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दुसरीकडे सरकारने नुकतीच ऐतिहासिक ३६ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले जात असताना पुन्हा कर्जवसुली स्थगिती व पुनर्गठनाच्या घोषणा करण्याची गरज काय असा सवाल उपस्थित करत कर्जमाफी खरी असेल तर कर्जवसुली स्थगितीची गरज काय? सरकारने शेतकऱ्यांना या शासन निर्णयामधून नेमके काय दिले आहे, हे स्पष्ट करावे अशी मागणी सुरेश काळे यांनी केली.

शासन निर्णयातील वीज बिलात सवलत आणि शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याच्या तरतुदीवरही स्वाभिमानीने सरकारला धारेवर धरले. शेतात पाणीच नाही, पिके करपून गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतीपंप सुरू करण्यासाठी वीजच वापरली जाणार नाही. मग वीज बिलात सवलत देऊन सरकार नेमके काय साध्य करणार असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत शासनाच्या घोषणा केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी करपलेल्या सोयाबीनचे पीक हातात घेऊन शासन निर्णयाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांचा तीव्र निषेध केला.

शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्या, तत्काळ पिक विमा मंजूर करा, सरसकट कर्जमाफी करा अश्या दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलन प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, अंबड तालुका उपाध्यक्ष मुकेश डुचे, सुभाष भोईटे, प्रकाश सुरासे, भारत उंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT