जालना ः चंदनझिरा पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगून दहशत पसरविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे 40 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनझिरा परिसरातील इंद्रायणी चौक येथे गावठी पिस्तूल घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जून रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता पोलिसांनी कारवाई करून आरोपी सचिन कैलास गायकवाड (रा.चंदनझिरा, जालना) यास ताब्यात घेतले.
सचिन गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, मारामारी व लूटमार यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून एक सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तंगवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोहेकॉ कृष्णा तंगे यांनी केली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी जमादार राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवी देशमाने करीत आहेत.