Heavy rains cause major damage to Kharif crops
आन्वा, पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीत होत्याचे नव्हते केले. हातातोंडाशी आलेल्या कापूस, मका, तूर, सोयाबीन व फळपिके आदी हजार हेक्टर वरील पिके पूर्णपणे नष्ट झाली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, अशी आश्वासन देण्यात आले होते; मात्र दिवाळी उलटून १० दिवस झाले तरीदेखील तालुक्यातील एकाही नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे.
राज्य शासनाने राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जम्बो पैकेज देखील जाहीर केले होते. तसेच सदरील नुकसान भरपाईची रकम दिवाळीपूर्वी सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासनही दिले होते. यानुसार जिरायती पिकांसाठी ८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरनुसार तर बागायती पिकासाठी १७ हजार रुपये व फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार होती. त्यामुळे या पॅकेजकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम खात्यात जमा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती; परंतु दिवाळीच्या दहा दिवसांनंतरही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यातच आता पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.कैलास दौड, शेतकरी, कारलावाडी
पिके गेल्यामुळे शेतकरी आधिक संकटात सापडले आहेत. दिवाळी अंधारात गेल्याने घरामध्ये आनंद नाही. आणि खिशात पैसा नाही. मंजूर झालेले अनुदानही वेळेवर न मिळाल्याने व त्यात परतीच्य पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.कैलास हजारी, शेतकरी आन्वा
दिवाळीच्या आधी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.ॲड. मुदसर पठाण, वाकडी