जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस file photo
जालना

Jalna News : जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

वीज पडून दोन जनावरे दगावली, रब्बी पिकांचे अतोनात नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Hailstorm in several parts of the district

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी मेघ गर्जना व विजेच्या कडकडाटात गारांचा पाऊस पडला. अवकाळी पाऊस व गारांमुळे रब्बीच्या गहू, हरभरा, ज्वारीसह कांदा बी व इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.

जालना शहरासह जिल्ह्यात १९ तारखेपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली. यावेळी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे बोरा एवढ्या गारा पडल्या.

जालना शहरात काही ठिकाणी हरभरा एव्हढ्या तर काही ठिकाणी त्यापेक्षा मोठ्या गारा पडल्या. यामुळे रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परतूर येथेही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरणानंतर पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी उष्मा वाढला होता. पाऊस सुरू होताच वीजपुरवठाही वारंवार खंडित झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.

अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा बी सह इतर पिकांना या पावसामुळे मोठा फटका बसल्याचे समजते. शहरातील नवीन मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल भिजू नये यासाठी व्यापाऱ्यांना पळापळ करावी लागली. सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले.

अंबड, बदनापूरसह इतर ठिकाणी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. तळणी, पुढारी वृत्तसेवा नवीन वर्षाच्या मुहूर्तावरच मंठा तालुक्यातील तळणी परिसरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे तळणी परिसरातील रब्बी हंगामातील उशिरा पेरणी झालेला गहू, हरभरा, तूर, ज्व-ारीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावर्षी तळणी परिसरात आंब्याचा मोहर व छोट्या कैऱ्या वादळी वाऱ्यामुळे गळून पडल्या. ज्या शेतकऱ्याचा गहू, ज्वारी, हरभरा अजूनही शेतातच आहे त्यांच्या पिकांना पावसाचा फटका बसला. काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाल्याने तेथे नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समजते.

आदेशानंतर पंचनामे नुकसानीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ स्तरावर पंचनाम्याचे आदेश आल्यानंतरच नेमका नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पंचनामे करण्यात येतील अशी माहिती मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT