Gutkha Smuggling : बोलेरो, रिक्षातून चालत होती गुटख्याची तस्करी file photo
जालना

Gutkha Smuggling : बोलेरो, रिक्षातून चालत होती गुटख्याची तस्करी

कल्पतरू पार्कमधून गुटख्यासह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gutkha Smuggling Was Being Carried Out Using Boleros and Rickshaws

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवैध आणि मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात जालना पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कल्पतरू पार्क परिसरात कारवाई करत तब्बल २५ लाख ८४ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, एलसीबीचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकास जालना येथील कल्पतरू पार्क परिसरातील एका बिल्डिंगसमोर दोन संशयास्पद वाहने उभी असून, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने कल्पतरू पार्क येथे जाऊन अचानक पाहणी केली.

तेथे उभ्या असलेल्या एका महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच२१, बीजी ८१९९) आणि एका अपे लोडिंग रिक्षामध्ये पोलिसांना प्रतिबंधित साठा आढळून आला. या वाहनांची झडती घेतली असता, त्यात मानवी आरोग्यास घातक असलेला राजनिवास, रजनीगंधा, सिग्नेचर पानमसाला आणि जाफरानी जर्दा असा एकूण १४ लाख ८४ हजार ४२ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.

याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात भादंवि विविध कलम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सुधीर वाघमारे, इरशाद पटेल, शिवप्रसाद एखंडे आणि कैलास चेके यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

१४ लाख ८४ हजारांचा गुटखा हस्तगत

पोलिसांनी १४ लाख ८४ हजार ४२ रुपयांचा गुटखा आणि गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ११ लाख रुपये किमतीची दोन्ही वाहने असा एकूण २५ लाख ८४ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही दोन्ही वाहने घटनास्थळी बेवारस मिळून आल्याने, वाहनांचे चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT