Gold and silver prices : पितृपक्षात सोने-चांदीच्या भावाचा नवीन विक्रम, बाजारात उलाढाल मंदावली  Pudhari Photo
जालना

Gold and silver prices : पितृपक्षात सोने-चांदीच्या भावाचा नवीन विक्रम, बाजारात उलाढाल मंदावली

वाढत्या दरामुळे ग्राहकांचे खिसे रिकामे झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Gold and silver prices rise; market turnover slows down

जालना, पुढारी वृत्तसेवा : पितृपक्षात सोने व चांदीच्या भावाने नवीन विक्रम स्थापित केला असून बुधवारी सोन्याचे भाव १ लाख ११ हजार रुपये तोळा तर चांदी १ लाख २८ हजार रुपये किलोपर्यंत पोहचल्याचे पहावयास मिळाले.

सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोनं-चांदी खरेदी परवडत नसल्याने बाजारपेठातील उलाढाल मंदावली आहे. दरम्यान विवाह किंवा अन्य महत्त्वाच्या मुहूर्ताना सोने खरेदी करण्यात येत असल्याने वाढत्या दरामुळे ग्राहकांचे खिसे रिकामे झाले आहेत. दिवाळीच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ होणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र पितृपक्षात सोने व चांदीच्या भावाने विक्रमी पातळी गाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुढील काळात दर आणखी वाढतील या भीतीने अनेक ग्राहक आताच सोने खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे, हिंदू धर्मात खरेदीसाठी चांगल्या न मानल्या जाणाऱ्या पितृपक्षातही अनेकजण सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. उच्च दरांमुळे दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची विक्री कमी होण्याचा अदांज सोन्याचांदीचे विक्रेत्याने वर्तविला आहे. ही भाववाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. ज्वेलर्ससाठी सोने विक्रीच्या दृष्टीने एक आव्हान ठरणार आहे.

एक तोळ्याचा दर ऐकून ग्राहक डोक्याला हात लावत आहेत. शुक्रवार पासून सोन्याचांदीच्या भावात तेजी आल्याचे पहावयास मिळाले. चांदीचे दर १ लाख ३२ हजारावरुन बुधवारी घसरुन १ लाख २८ हजारांवर आले. औद्योगिक क्षेत्रात सोलर पॅनेल, इले-क्ट्रिक वाहनांची बॅटरी यासारख्या क्षेत्रात चांदीचा वापर होत असल्याने चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. सोने व चांदीच्या दरात होणाऱ्या वाढीचा फायदा गुंतवणूकदार घेता आहेत. ज्यामुळं गुंतवणुकदारांचे लक्ष दोन्ही मौल्यवान धातुंकडे आहे. सोने व चांदीच्या दरात होणारी वाढ सर्व समान्य व गोरगरिबांच्या आवाक्या बाहेर झाल्याने आगामी काळात सोने व चांदी खरेदीचा कल या वर्गातून कमी होण्याची शक्यता आहे.

विदेशी गुंतवणूकदार व सटोडियांमुळे सोन्या-चांदीच्या भावात तेजी आल्याचे दिसत आहे. सोन्या-चांदीचे भाव विदेशी गुंतवणूकदार व सटोडियांच्या हातात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. भावात अनिश्चितता राहणार असल्याचे दिसत आहे.
-भरत गादिया, भरत ज्वेलर्स
सोने व चांदीतील गुंतवणूक ही फायदा व सुरक्षिततेची समजली जात असल्याने गुंतवणूकदार यात मोठ्या प्रमाणात गुंतले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह गुंतवणूकदारांतून मागणी वाढल्याने सोने व चांदीच्या भावात विक्रमी वाढ झाली असल्याचा अंदाज आहे.
- संजय लव्हाडे, व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT