वॉल्व्ह पाण्याचा कुणी उघडू नये म्हणून, मुरमाचा भराव गेटवर टाकण्यात आलेला होता जेसीबीने द्वारे मुरमाचा भराव काढून वॉल्व्ह फिरवत पाणी सोडण्यात आले. (छाया : अकबर शेख) 
जालना

Jalna Godavari river water released| गावांतील शेतकऱ्यांच्या पाणी सोडण्याच्या मागणीला अखेर यश; गोदावरी नदीपात्रात पाणी दाखल

दोन तासांच्या चक्काजाम आंदोलनानंतर प्रशासनाला जाग; ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ केला होता ठप्प

शिवसेना शिंदे गटाचे गेवराई तालुका व्हीजेएनटी प्रमुख बाळासाहेब खेडकर, अबंड लोकसभा संघटक राजेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन यश

राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २५ शेतकरी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची आंदोलनकर्त्यांची माहिती; अद्याप एफआयआरची प्रत मिळालेली नाही

दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील आमदारांना जे जमले नाही, ते शेतकऱ्यांनी आंदोलनातून करून दाखवले!

शहागड : गेवराई व अंबड तालुक्यांतील गोदावरी नदीकाठच्या १६ गावांमधील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेत गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तळणेवाडी येथील जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून नाल्याद्वारे सुमारे ४०० क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे १६ गावांतील नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाटा येथे शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात नागरिकांना आणि जनावरांना पिण्यासाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, तालुका व जिल्हा प्रशासनाकडून सुरुवातीला या मागणीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे गेवराई तालुका व्हीजेएनटी प्रमुख बाळासाहेब खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील सोलापूर-धुळे महामार्गावर तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन केले.

या आंदोलनामुळे गेवराई तालुक्यासह अंबड तालुक्याच्या सीमेलगत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही बाजूंनी सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची गर्दी झाली होती. शहागड परिसरातही जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक खोळंबली होती. तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.

प्रशासनाचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा; शेतकरी आंदोलनावर ठाम

आंदोलन सुरू असताना पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले. अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही दिला. मात्र, शेतकऱ्यांनी या इशाऱ्याला न जुमानता आपले आंदोलन सुरूच ठेवले. ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं!’ अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाचीही काही काळ धावपळ उडाली.

या आंदोलनप्रकरणी राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुमारे २५ शेतकरी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. मात्र, अद्याप संबंधित आंदोलनकर्त्यांना एफआयआरची प्रत मिळालेली नव्हती. त्यामुळे गुन्ह्याचे नेमके स्वरूप व त्यातील तपशील अधिकृतरीत्या समोर आलेला नव्हता. गुन्हे दाखल होण्याचा इशारा मिळूनही शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवले. गुन्ह्यांना न जुमानता शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा दिला.

१६ गावांच्या पाणीप्रश्नासाठी शेतकऱ्यांचा एकजुटीने लढा

गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, राक्षसभुवन, माळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, नागझरी, आगार नांदर आणि गंगावाडी, तसेच अंबड तालुक्यातील शहागड, वाळकेश्वर, गोरी-गंधारी, आपेगाव, बळेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव आणि कुरण या गावांतील शेतकऱ्यांसाठी शहागड-वाळकेश्वर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये तत्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीसाठी १६ गावांतील हजारो शेतकरी एकत्र आले होते. शिवसेना शिंदे गटाचे गेवराई तालुका व्हीजेएनटी प्रमुख बाळासाहेब खेडकर, लोकसभा संघटक राजेश राऊत, कैलास पोटफोडे, राजाभाऊ डाके, सुभाष केरुळकर, कीर्तीकुमार शेळके यांच्यासह हजारो शेतकऱ्यांचा सहभाग होता

प्रशासन खडबडून जागे; जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाची बैठक

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने अखेर निवेदन स्वीकारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तळणेवाडी येथील उजव्या कालव्यातून नाल्याद्वारे सुमारे ४०० क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी चार दिवस सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बुधवारी हे पाणी शहागड येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दिशेने पुढे सरकले होते. गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे व खोलगट भाग असल्याने पाणी पुढे जाण्यास काहीसा वेळ लागत आहे. मात्र, पाणी नदीपात्रात दाखल झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याचा दिलासा

गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या उर्वरित कालावधीसह डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १६ गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याच्या प्रश्नालाही काही प्रमाणात मदत होणार आहे.

या पाण्याचा लाभ गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, राक्षसभुवन, माळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, नागझरी, आगार नांदर आणि गंगावाडी, तसेच अंबड तालुक्यातील शहागड, वाळकेश्वर, गोरी-गंधारी, आपेगाव, बळेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव आणि कुरण या गावांना होणार आहे.

दोन्ही तालुक्यांतील आमदारांना जे जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखवले!

गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील आमदारांकडून हा प्रश्न मार्गी लागला नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये होती. अखेर शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत २४ तासांचा अल्टिमेटम दिला आणि राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा लढा यशस्वी ठरल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

हा लढा माझा नसून शेतकऱ्यांचा : बाळासाहेब खेडकर

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गेवराई तालुका व्हीजेएनटी प्रमुख बाळासाहेब खेडकर यांनी सांगितले की, हा लढा यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठे धाडस दाखवले. गुन्हे दाखल होण्याचा इशारा मिळूनही शेतकरी मागे हटले नाहीत. शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. शेतकऱ्यांनी माझे अभिनंदन केले असले तरी हा लढा माझा एकट्याचा नसून सर्व शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच प्रशासनाला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. भविष्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ पडल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असेही खेडकर यांनी स्पष्ट केले.

गोदावरी नदीपात्रात पाणी दाखल झाल्याने १६ गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे प्रशासनाला अखेर झुकावे लागले असून, पाण्यासाठी उभारलेला हा लढा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT