Ghansawangi Taluka battered by unseasonal rains accompanied by stormy winds
अविनाश घोगरे
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात घनसावंगीसह बोडखा, म, चिचोली, शिंदखेड, खडकावाडी, खडका, मांदळा, मंगूजळगावसह आदी गावांत बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यात ज्वारी, बाजरी, गह तसेच आंबा, फळपिकांसह भाजीपाला आणि उसाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली तर काही ठिकाणी लग्नासाठी उभारलेले मंडप कोसळले.
घनसावंगी तालुक्यात बुधवार (१३) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. बोडखा येथे ज्ञानेश्वर ढेरे यांनी लग्नासाठी उभार लेला मंडप कोसळला. योगेश उद्धव ढेरे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघाड्यावर आला. तालुक्यातील घनसावंगी, बोडखा, म, चिचोली, शिंदखेड, खडकावाडी, खडका, मांदळा, मंगूजळगावसह आदी गावांना अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने आतोनात नुकसान झाले. लग्न सोहळ्यावर अवकाळीने विघ्न आणल्याने वधू-वर पित्यांचे टेन्शन चांगलेच वाढवले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने मंडप उडाल्याने तसेच भिजल्याने मंडप वाल्याचे देखील नुकसान झाले.
तालुक्यात मंगळवार पासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक आणि बागायत दारांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळी मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठे संकट कोसळले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
वादळी वारा व पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची धावाधाव झाली. यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात फळ बागायतदार शेतकऱ्याच्या आंबा फळपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने झाडाखाली आंब्याचा सडा पडलेला दिसून येत आहे. अवकाळीने दाणादाण उडवली आहे.
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे डीजे, मंडप, डेकोरेशनसह इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मंडप उडून गेले असून इतर साहित्यही खराब झाले आहे.-शफिक आतार, मंडप व्यावसायिक, रांजणी