Ghansawangi Officials review the SIR campaign
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि एकही पात्र मतदार वंचित राहू नये, या उद्देशाने अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी घनसावंगी येथे सुरू असलेल्या मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी तहसीलदार रमेश पागोटे यांच्या उपस्थितीत विविध भागांतील कामकाजाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
आढावा दौऱ्यादरम्यान उपविभागीय अधिकारी पारधी यांनी एसआयआर मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष तपासणी केली. सुपरवायझर होनराव, बीएलओ सचिन डोके तसेच ग्राम महसूल अधिकारी अशोक गायकवाड यांनी राजेश उगले यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबातील पात्र मतदारांचे अर्ज भरून घेतले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नागरिकांना अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, तांत्रिक समस्या व विविध शंकांचे जागेवरच निराकरण केले.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या, तर आवश्यक कागदपत्रांबाबतही योग्य सूचना देण्यात आल्या. प्रशासनाच्या या घरपोच उपक्रमामुळे नागरिकांची गैरसोय टळून अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. तहसीलदार रमेश पागोटे यांनीही मोहिमेतील कामकाजाचा आढावा घेत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
घनसावंगी तालुक्यात एसआयआर मोहिमेचे काम वेगाने सुरू अस प्रशासनाच्या घरपोच उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिला मिळत आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी आवश्या कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज भरून प्रशासनान सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
काम मुदतीत पूर्ण करा
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना एसआयआर मोहिमेचे काम अचूक, पारदर्शक आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांचे अर्ज भरून घेणे, कोणताही पात्र नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.