घनसावंगीः पेरणी केलेल्या पिकांना तुषारच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे.  pudhari photo
जालना

Jalna agriculture news : पावसाची विश्रांती; शेतकरी हवालदिल

तुषार सिंचनाच्या आधारावर खरीप पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; आभाळाकडे लागले डोळे

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या रिमझिम स्वरूपाच्या समाधानकारक पावसामुळे घनसावंगी तालुक्यात खरीप हंगामाबाबत आशेचे वातावरण निर्माण झाले होते. या पावसाचा लाभ घेत कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. सुरुवातीला पिकांची उगवणही चांगली झाली; मात्र त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने सलग विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरीप पिके वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे.

सलग अनेक दिवस पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. त्यातच कडाक्याचे ऊन व सतत वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे पिकांवर ताण वाढला असून अनेक ठिकाणी कापसाची रोपे कोमेजू लागली आहेत. सोयाबीनची पाने पिवळी पडून वाढ खुंटत असल्याचे चित्र आहे. काही भागांत पावसाअभावी पेरलेले बी अद्याप उगवले नसल्याने दुबार पेरणीची शक्यताही निर्माण झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल, शेततळे अथवा अन्य सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ते तुषार सिंचनाद्वारे पिकांना जीवदान देण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. कमी पाण्यात अधिक क्षेत्राला ओलावा देता येत असल्याने तुषार सिंचन सध्या प्रभावी पर्याय ठरत आहे. सकाळी व सायंकाळी तालुक्यातील अनेक शेतांमध्ये तुषार संच सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मर्यादित पाणीसाठा लक्षात घेऊन शेतकरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सिंचन करत आहेत. काही ठिकाणी एक दिवसाआड, तर काही ठिकाणी गरजेनुसार पिकांना पाणी दिले जात आहे. दुसरीकडे, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून पावसाचा खंड आणखी वाढल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणीसाठी घेतलेले कर्ज, बियाणे, खते व औषधांवरील खर्च आणि अनिश्चित हवामानामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

कृषी तज्ज्ञांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा, सकाळी किंवा सायंकाळी तुषार सिंचन करण्याचा, जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आंतरमशागत करण्याचा आणि पिकांवरील ताण कमी करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून लवकरच दमदार पाऊस होऊन खरीप पिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा पावसाचा खंड कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप पेरणीची स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक -क्षेत्र (हेक्टर)

कपाशी - ४७,३२६

सोयाबीन - २०,४९२

तूर -५,६३९

मूग -३,३२५

बाजरी -८४०

मका -३९९

उडीद -६९२

इतर -५००

कडधान्ये

जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे आम्ही मोठ्या आशेने खरीप पिकांची पेरणी केली. सुरुवातीला पिकांची उगवण चांगली झाली; मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतातील ओलावा कमी झाला. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी काही प्रमाणात पीक वाचवत आहेत; मात्र केवळ पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
लक्ष्मण मांगदरे , शेतकरी, रवणा
आमच्या शेतातील बोअरवेलमधील उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देत आहोत. त्यामुळे सध्या तरी पिके काही प्रमाणात तग धरून आहेत. आता वेळेत दमदार पाऊस झाला तरच खरीप पिकांना जीवदान मिळेल; अन्यथा यंदाचा हंगाम आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारा ठरू शकतो.
गौरव कवडे, शेतकरी, लिंबी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT