घनसावंगीः तालुक्यात ठिकठिकाणी पडलेल्या भूरभूर पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेेत.   (छायाः अविनाश घोगरे)
जालना

Jalna rainfall : रिमझिम सरींनी आशा जागल्या; दमदार पावसाची आस

पिकांना तात्पुरता आधार, शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर; सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी : तालुक्यात रविवारी दिवसभर अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. पावसाची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांना या सरींनी काहीसा दिलासा दिला असला, तरी शेतशिवाराला अद्याप दमदार पावसाची तहान कायम आहे. आभाळ भरून येते, दोन-चार सरी पडतात आणि पुन्हा उघडीप पडते, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची अवस्था नाजूक झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी होत चालल्याने पिके पाण्यासाठी आसुसली आहेत. अशा परिस्थितीत रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि अधूनमधून रिमझिम सरी सुरू झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही काळ समाधान दिसून आले.

मात्र, या हलक्या सरींनी तहानलेल्या जमिनीची तहान भागलेली नाही. पिकांच्या मुळाशी पुरेसा ओलावा पोहोचण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. अनेक भागांत विहिरी, नाले, तलाव व पाणवठ्यांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पिकांसोबतच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न पुढे उभा ठाकण्याची शक्यता आहे. यामुळे बळीराजांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

शिवाराची तहान कायम

शेतकऱ्यांसाठी सध्या प्रत्येक पावसाची सर आशेचा किरण ठरत आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना रिमझिम सरींनी थोडा धीर दिला असला, तरी एक-दोन दिवसांचा पाऊस पुरेसा ठरणार नाही. जमिनीत चांगला ओलावा निर्माण होऊन पिके सावरण्यासाठी सलग दमदार पावसाची गरज आहे. रविवारी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. आता आभाळ भरून यावे, जोरदार सरी कोसळाव्यात आणि तहानलेल्या शिवाराला जीवदान मिळावे, अशीच आस शेतकऱ्यांना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT