आघाडी कामाला लागली, महायुतीचा मात्र उमेदवार ठरेना file photo
जालना

Assembly Election : आघाडी कामाला लागली, महायुतीचा मात्र उमेदवार ठरेना

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. घनसावंगी विधानसभेत महाविकास आघाडीकडून राजेश टोपे यांची उमेदवारी फिक्स असून ते कामाला लागले आहेत. परंतु, महायुतीत ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला जाणार हे ठरलेले नाही. घनसावंगी विधानसभेची जागा भाजप, शिंदे सेना की अजित पवार गटाला मिळणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. जो उमेदवार आधी कामाला लागतो त्याला निवडणुकीत नियोजन करणे सोपे जाते. सध्या राजेश टोपे आणि सतीश घाटगे हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ही जागा निश्चित असल्याचे जमा आहे. त्यामुळे राजेश टोपे यांचे पारंपारिक विरोधक असलेले ठाकरे गटाचे हिकमत उढान हे पक्ष बदलासाठी मोठे प्रयत्न करत आहेत.

तिकिटासाठी ते अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. परंतु, त्यांचा पक्षप्रवेश कोणत्याच पक्षात होत नसल्याने त्यांचे समर्थक संभ्रमावस्थेत आहेत, अशी चर्चा मतदारसंघात आहे. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. महायुतीची जागा कोणाला जरी सुटली तरी सतीश घाटगे हे प्रबळ उमेदवारीचे दावेदार मानले जात आहे. सध्या ते शिवसेना तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

भूमिकेकडे लक्ष

हिकमत उढाण लवकर भूमिका घेतील असे अपेक्षित होते. त्यांचे समर्थक अनेक महिन्यापासून त्यांच्या भूमिकेकडे वाट पाहत आहे. परंतु हिकमत उढांण यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही. महाविकास आघाडी त्यांना तिकीट देणार नसल्याने ते कोणत्याही पक्षाचे तिकीट घेऊन निवडणुकीत उभा राहणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT