घनसावंगी (जालना) : तालुक्यातील तनवाडी-राहेरा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सुमारे ७० ते ८० एकरांवरील उसाचे पीक आगीत जळून खाक झाले. या आगीचे कारण महावितरणच्या वीज वाहिनीतील शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि शेतकऱ्यांचे अनेक महिन्यांचे श्रम क्षणात राख झाले.
या आगीत ज्ञानदेव पाटीलबा शेडगे, किशोर ज्ञानदेव शेडगे, तुकाराम पाटीलबा शेडगे, विष्णु बापुराव इंगळे, अंजना गंगाधर इंगळे, द्रोपदाबाई बापूराव इंगळे, दामोधर बापुराव इंगळे आणि लक्ष्मण दामोधर इंगळे या शेतकऱ्यांचे ७० ते ८० एक ऊसपीक पूर्णतः जळून गेले आहे. अनेकांनी ऊसपिकावर कर्ज काढून शेती केली होती, मात्र या आगीत त्यांचे सर्व काही उद्ध्वस्त झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच घनसावंगी नगरपंचायत अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून गेला होता. ग्रामस्थांनीही शेतकऱ्यांना मदत करत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आधीच अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरायच्या आधीच या आगीने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. शेतकऱ्यांचे महिनोमहिन्यांचे परिश्रम आणि मोठा खर्च एका क्षणात राख झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मदत मंजूर करावी
शेतकरी बांधवांनी शासनाकडे मागणी केली आहे की, महावितरणकडून शॉर्टसर्किटमुळे झालेल्या या आगीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी. तसेच पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी वीज वाहिन्यांची योग्य देखभाल आणि दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तनवाडी परिसरात शोककळा पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असहायता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने या घटनेचा गंभीरपणे विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.