टेंभुर्णी : रावसाहेब अंभोरे
जाफाराबाद तालुक्यातील पासोडी येथे (शनिवार) भल्या पहाटे काळाने झडप घालून मृत्यूमुखी पडलेल्या पाच जणांवर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील घटनास्थळी भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांनी ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेऊन शासकीय मदत करण्यासाठी तहसीलदार यांना सूचना दिल्या.
जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या गोरगरीब मजुरांचा अपघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटना ही मनाला चटका लावणारी आहे असे आ. संतोष दानवे यांनी म्हटले. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी व ज्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास आ. संतोष दानवे यांनी दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार श्रीमती सारिका भगत, वैद्यकीय अधिकारी डी.एम पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे यावेळी उपस्थित होते.
शेवटी रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाल्यानंतर जाफाराबाद पोलीस ठाण्यात चालक संतोष शेषराव कोल्हे रा. जाफाराबाद व टिप्पर मालक गोपाल गवळी रा. खापरखेडा ता. जाफाराबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व दोघांना गजाआड करण्यात आले.
वाळूच्या ढिगाऱ्या खाली दबलेल्या चिमुकल्या धनश्रीला मात्र ग्रामस्थांनी तातडीने बाहेर काढून तीचे प्राण वाचविले. मृत गणेश धनवाई यांच्या पत्नी जनाबाई ह्या लंघुशंकेसाठी बाहेर गेल्यामुळे त्या देखील या घटनेतून बालबाल वाचल्या असे ग्रामस्थांनी सांगितले.
जाफराबाद तालुक्यात वाळू तस्करांनी थैमान घातले आहे. यापूर्वी बोरगाव बुद्रुक येथील उमेश फदाट या युवकाची बुलढाणा जिल्ह्यातील इरला शिवारात निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पासोडी येथे गेलेले पाच बळी असे एकूण सहा बळी अवैध वाळू वाहतुकीमुळे गेले आहेत. सदर कामाचा गुत्तेदार आणि वाहन चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये मदत तात्काळ देण्यात यावी. महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि वाळू तस्कर यांच्या आपसी मिलीभगतीच्या माध्यमातून सुरू असलेली जीवघेणी अवैध वाळू तस्करी थांबवण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
रामधन कळंबे
तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)