Jalna news : कॉपर चोरीप्रकरणी चौघे जेरबंद file photo
जालना

Jalna news : कॉपर चोरीप्रकरणी चौघे जेरबंद

सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Four arrested in copper theft case

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यातील सोलर प्लांटमधून तांब्याच्या केबल व इतर साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपीचा तसेच चोरीचे कॉपर खरेदी करणाऱ्या तिघांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ७ लाख २९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सोलर प्लांटवरील कॉपर चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचीही उकल झाली आहे.

जिल्ह्यातील सोलर प्लांटवर होणाऱ्या कॉपर चोरीच्या घटनांचा तपास करून आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

१० ऑक्टोबर रोजी तपास सुरू असताना, २४ सप्टेंबर रोजी टाटा पॉवर प्लांटमधून तांब्याच्या केबल, एमसी-४ कनेक्टर, वाय-कनेक्टर आणि कंड्युट पाइप चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा तपास करत असताना संशयीत सुदाम बाळू काळे (रा. हातडी, ता. घनसावंगी, जि. जालना) हा पोलिसांच्या हाती लागला.

त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, टाटा पॉवर प्लांटमधील चोरीसह आणखी १७ सोलर प्लांटवरील कॉपर चोरीचे गुन्हे दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेला मुद्देमाल गालिब अमर चाऊस (रा. घनसावंगी), जावेद जिलानी शेख (रा. रवणापराडा, ता. अंबड) आणि शकील बशीर शेख (रा. जुनी एमआयडीसी, जालना) यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दरम्यान. ६ ऑक्टोबर रोजी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई, (ता. अंबड) येथे एका बंद घराचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. हा गुन्हाही संशयीत सुदाम काळे याने दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात वापरलेली होंडा शाइन मोटारसायकल आणि ५ हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

असा केला मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या ५३७किलो तांब्याच्या तारा व केबलमधून जाळून काढलेले तांबे, ८० हजार रुपये किमतीची होंडा शाइन मोटारसायकल, ५ हजार रुपये रोख रक्कम. असा ७ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील सोलर प्लांटवरील कॉपर चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT