Four and a half acres of sugarcane burnt due to short circuit
अंबड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बनटाकळी शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी मोहन गव्हाणे यांच्या शेतातील सुमारे साडेचार एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना सोमवारी (दि.१६) रोजी घडली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट असून पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची इतर पिके हातची गेली आहेत. अशा परिस्थितीत ऊस हे एकमेव भरवशाचे पीक म्हणून शेतकरी मोठ्या आशेने त्याकडे पाहत होते. मात्र, विद्युत पोलवरील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत साडेचार एकर ऊस जळून खाक झाल्याने मोहन गव्हाणे यांच्या कुटुंबाच्या आर्थिक आशेवर पाणी फिरले आहे.
या घटनेची माहिती माजी आमदार राजेश टोपे यांना देण्यात आली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने बनटाकळीचे तलाठी डोणगावकर यांच्याशी संपर्क साधत नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. नैसर्गिक संकटांशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांवर आता विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे नव्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. संबंधित विद्युत वितरण कंपनीने या घटनेची सखोल चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुष्काळाचा सामना करत असताना इतर सर्व पीक कमी पावसामुळे हातची निघून गेली त्यामुळे सर्व आशा उसावर अवलंबून होत्या त्या मध्ये या शॉर्ट सर्किट मुळे सर्व आशेवर पाणी फिरले आहे. शासन पंचनामा करून घेतात परंतु प्रत्यक्षात त्याची भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामध्ये ऊस सारख्या पिकाची पीक विमा योजना मध्ये समाविष्ट नसल्यामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान होत आहे.मोहन गव्हाणे, शेतकरी बनटाकळी