Forced bundling of inferior fertilizer with reputed brands; arbitrary practices by agricultural dealers
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात अंबड तालुक्यासह ग्रामीण भागातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खत विक्री दरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक सुरू केल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. नामांकित कंपनीचे खत हवे असल्यास त्यासोबत निकृष्ट दर्जाचे दाणेदार खत किंवा सुपर फॉस्फेट खरेदी करण्याची सक्ती काही विक्रेत्यांकडून केली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
अनेक शेतकरी विशिष्ट कंपनीचे खत मागण्यासाठी दुकानात गेल्यानंतर सदर खत स्वतंत्र मिळणार नाही, त्यासोबत दुसरे खत घ्यावेच लागेल असे विक्रेते सांगत आहे. त्यामुळे गरज नसतानाही शेतकऱ्यांना अतिरिक्त खत खरेदी करावे लागत आहे. मागील हंगामातील जुन्या साठ्यातील खताची विक्री नव्या वाढीव दराने केली जात असल्याचाही आरोप आहे. खताच्या गोणीवरील जुना दर आणि प्रत्यक्ष आकारला जाणारा दर यात तफावत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पेरणीपूर्व काळात खताची तातडीची गरज असल्याने शेतकरीही नाईलाजाने जादा पैसे मोजून खत खरेदी करत आहेत. कृषी विभागाकडे तक्रार करूनही तत्काळ कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने कृषी सेवा केंद्रांवर अचानक तपासणी करून साठा, विक्री नोंदी, बिलांची पडताळणी तसेच सक्तीने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खत विक्रीतीला गैरप्रकारांवर आळा घातला नाही, तर हजारो शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.
युरियासाठी 'लिंकिंग'ची सक्ती ?
अंबड तालुक्यासह ग्रामीण भागातील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खताच्या विक्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर 'लिकिंग'ची सक्ती केली जात असल्याची तक्रार होत आहे. एका युरियाच्या बॅगसोबत दुसरी दाणेदार किंवा सुपर फॉस्फेट खताची बॅग खरेदी केली तरच युरिया दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. युरियाची २६५ किमतीची गोणी ३००ते ३५० रुपयाला विकली जात आहे.