Flower Farming : दुष्काळात शेतकऱ्याला फुलशेती ठरली वरदान file photo
जालना

Flower Farming : दुष्काळात शेतकऱ्याला फुलशेती ठरली वरदान

वर्षाला सहा लाख रुपयांचे उत्पन्न, पाणी व कामाचे योग्य नियोजन, पारंपारिक पीकाला फाटा

निलेश पोतदार

Flower farming is a boon for farmers during drought

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : अस्मानी संकट आणि दुष्काळी परिस्थितीसमोर हात टेकण्याऐवजी जिद्द, काबाडकष्ट आणि नियोजनाची जोड दिली तर शेतीतूनही कसे 'सोनं' पिकवता येते, याचा जिवंत वस्तुपाठ राऊत कुटुंबाने घालून दिला आहे. शेतकरी नंदकिशोर भगवान राऊत आणि त्यांच्या मुलांनी शेतात गुलाब, बिजली, निशिगंधा, झेंडू आणि शेवंतीची दर्जेदार फुले फुलवून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्व खर्च बाजूला काढून वर्षाला ५ ते ६ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे.

भोकरदनचे शेतकरी नंदकिशोर राऊत यांना त्यांचे दोन मुले आणि भावजयांची भक्कम साथ लाभली. शेतातील खुरपणीपासून ते मालाच्या काढणीपर्यंत संपूर्ण घर एकदिलाने राबत असल्याने ही फुलबाग बहरली आहे. पाण्याची कमतरता हा शेतीतील सर्वात मोठा अडसर मानला जातो; मात्र राऊत कुटुंबाने यावर मात करण्यासाठी शेतात ३ बोअर घेतले आणि उपलब्ध पाण्याचा थेंब न् थेंब पिकांसाठी वापरला जावा म्हणून ठिबक सिंचनाची काटेकोर अंमलबजावणी केली.

वेळेवर खत आणि औषध फवारणीचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे फुलांचा दर्जा उत्तम राहिला. दोन वर्षापूर्वी लागवड केलेल्या गुलाबाच्या बागेतून बारमाही उत्पन्न मिळत असून, प्रामुख्याने जून ते डिसेंबर या काळात दर्जेदार माल निघतो. बिजली फुलाला दसरा ते दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत फुलांना मोठी मागणी असते. सणाच्या दिवशात ५० ते ८० रुपये दर मिळाल्याने चांगली कमाई झाली. निशिगंधाला सुमारे ७ हजार रुपये खर्च करून केलेल्या निशिगंधाच्या लागवडीतून सहा मिळत आहे. महिन्यांनंतर उत्पादन सुरू झाले. सुगंधी निशिगंधाला बाजारात ५० ते १२० रुपये दर मिळत आहे. याशिवाय शेवंतीला चांगला दर मिळत आहे.

वडील गेल्या पाच-सहा वर्षांपासून अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळून आहेत, तर माझी आई वयाच्या ८० व्या वर्षीही आज शेतात लसूण लावण्याचे काम करते. त्यांना पाहून आम्हाला कष्ट करण्याची ऊर्जा मिळते. तीन बोअर आणि ठिबकच्या जोरावर पाण्याचे नियोजन केले. भाऊ, भावजया आणि मुलांच्या साथीने रात्रंदिवस राबलो, म्हणून आज वर्षाला ५ ते ६ लाखांचा निव्वळ नफा हातात पडतो.
नंदकिशोर राऊत (प्रगतशील शेतकरी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT