female Gram Panchayat officer Molestation Bhokardan
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील कोठारा जैनपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता सुरज पांडुरंग रोडे याने महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा विनयभंग करून त्यांना एक लाख रुपये खंडणीची मागणी करीत काार्यालयातील कागदपत्रे इतरत्र फेकून देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरुन भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये सुरजवर विनयभंग, खंडणी मागणे त्याचप्रमाणे सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज यास अटक करून भोकरदन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील सहाने यांनी दिली.
महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या दहा वर्ष चार महिन्यांपासून कोठारा जैनपूर येथे कार्यरत आहेत. सुरज पांडुरंग रोडे हा त्यांना गेल्या अनेक दिवसापासून त्रास देत आहे.
१७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्याने ग्रामपंचायत अधिकारी या सरपंच दत्तू सोनवणे यांच्या सह उपसरपंच व इतर सदस्यां सोबत काम करीत असताना सुरज रोडे तेथे आला व त्याने टेबलाजवळ येऊन त्यांच्या पायाला पाय लावून टेबलावरील कागदपत्रे इतरत्र फेकून दिली. विहीर मंजूर करण्यात यावी तसेच मंजूर असलेल्या घरकुलाचे पैसे बांधकाम न करता देण्यात यावे यासाठी तो महिला ग्राम पंचायत अधिकाऱ्यांकडे मागणी करीत होता. त्यास त्यांनी विरोध केला असता सुरज याने त्यांच्याकडे एक लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे.