Father Children Electrocuted in Varud
जालनाः तालुक्यातील नाव्हा गावाजवळील वरुड येथे मल्चिंग पांगविण्यासाठी शेतात गेलेल्या वडिलांसह दोन मुलांचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला. विनोद तुकाराम म्हस्के (वय 30), श्रध्दा (वय 12) व समर्थ (वय 8) अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही घटना आज (दि.१०) सकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरुड येथे आज सकाळी विनोद म्हस्के हे शेतात मल्चिंग पांगविण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात पडलेल्या विजेच्या तारेला ते चिटकले. यावेळी जवळच खेळत असलेल्या श्रध्दा व समर्थ या त्यांच्या दोन मुलांना वडिलांना विजेचा धक्का लागल्याचे लक्षात आले. ते दोघे वडिलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा धक्का लागला. यात तिघांचाही मृत्यू झाला.
यावेळी विनोद म्हस्के यांची पत्नी मनिषा हिने आरडा ओरड केल्याने परिसरातील शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेत वीज पुरवठा खंडित केला. तिघांना रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. विनोद म्हस्के यांचे साडू कैलास देवीदास जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.