Dattatray Bharane visit Badnapur
बदनापूर: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी येथे आले असता, त्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. तलाठी पंचनाम्यासाठी येत नाहीत, पंचनामे होऊनही मदत मिळत नाही, अशा तक्रारी करत शेतकऱ्यांनी 'सरसकट नुकसान भरपाई'ची मागणी केली.
गेवराई बाजार शिवारात पाहणी सुरू असताना एका शेतकऱ्याने थेट मंत्र्यासमोरच आपली व्यथा मांडली. "माझी एक एकर शेती असून, जर मला नुकसान भरपाई मिळाली नाही, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही," असे तो शेतकरी म्हणाला. या विधानाने कृषीमंत्री आणि उपस्थित अधिकारीही काही काळ अवाक् झाले. शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनावर रोष व्यक्त केला. गुडघाभर पाणी साचलेल्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी कमालीचे संतप्त झाले होते.