Farmers' sit-in protest at the District Collector's office
जालना, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ठाण मांडत ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाने बसविलेले पजर्यन्यमापक सदोष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यातील जयपूर, ढोकसाळ, वडगाव, तळणी, गोसावी पांगरी या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने अद्यापही पंचनामे न केल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले होते.
प्रशासनाकडून अद्यापही या भागात पंचनामे करण्यात आले नसतांनाच काही भागात पर्जन्यमापक नसून अनेक गावात ती सदोष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. काही पर्जन्यमापक गावापासून तीस किमीच्या अंतरावरवर असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशीच चर्चा करण्यावर ठाम असल्याचे दिसुन आले. यावेळी काही काळ शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ठाम मांडून बसले होते. अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये यावेळी शाब्दीक चकमक उडाल्याने पोलिस बंदोबस्त वाढवला होता.
यावेळी एका शेतकऱ्याने खिशातून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. संबंधित युवा शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.