कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात file photo
जालना

Jalna News : कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

उत्पन्न घटल्याने बाजारपेठेतील उलाढालीवरही परिणाम; सणाचा उत्साह पडला फिका

पुढारी वृत्तसेवा

Farmers' Diwali in darkness due to drought

अविनाश घोगरे

घनसावंगी : तालुक्यात यंदाच्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. पावसाने दिलेली ओढ, खरीप पिकांचे झालेले नुकसान आणि उत्पादनात झालेली मोठी घट यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा आलेला नाही. त्यामुळे वर्षभर कष्ट करून मिळणाऱ्या उत्पन्नातून दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याऐवजी यंदा अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक परिस्थितीचा विचार करून खर्चाला लगाम घालावा लागत आहे. घराघरांत दिवाळीची तयारी सुरू असली, तरी शेतकऱ्यांच्या मनातील चिंतेचे सावट मात्र कायम आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पिके चांगली दिसत असताना पावसाने मोठी उघडीप दिली. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, तूर, मूग यासह विविध पिकांना मोठा फटका बसला. अनेक भागांत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, काही शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित धान्याऐवजी केवळ भुसा आणि पशुखाद्यच उरल्याचे चित्र आहे.

त्यामुळे खरीप हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. दिवाळी म्हटली की ग्रामीण भागात नवीन कपडे, फराळ, मिठाई, फटाके, घरगुती साहित्य आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र यंदा आर्थिक अडचणीमुळे अनेक कुटुंबांकडून केवळ गरजेपुरतीच खरेदी केली जात आहे. शेतमालाचे घटलेले उत्पादन, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा कमी आहे. त्यामुळे दिवाळीचा उत्साह असला तरी खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे.

दुष्काळाची झळ केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने बाजारपेठेतील खरेदीवर परिणाम झाला आहे. कपडे, किराणा, मिठाई, फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दिवाळीच्या साहित्याच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत होणारी मोठी उलाढाल यंदा कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरवर्षी दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच ग्रामीण बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीन फुलून जातात. यंदा मात्र अनेक ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या आणि त्यांच्या खरेदीचे प्रमाण दोन्ही कमी झाल्याचे चित्र आहे. 'पहिले घर चालवायचे की दिवाळी साजरी करायची,' असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे नवीन कपडे, महागड्या वस्तू किंवा मोठ्या प्रमाणात फराळ करण्याऐवजी उपलब्ध परिस्थितीत साधेपणाने सण साजरा करण्याकडे कल वाढला आहे.

ग्रामीण भागात दिवाळी हा केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टानंतर मिळणाऱ्या आनंदाचा क्षण असतो. मात्र यंदा कोरडी पडलेली शेती, घटलेले उत्पादन, रिकामे होत चाललेले जलसाठे आणि वाढता खर्च यामुळे या आनंदावर दुष्काळाने पाणी फेरले आहे. घराच्या अंगणात पणत्या लागणार असल्या, तरी शेतकऱ्यांच्या मनातील आर्थिक चिंतेचा अंधार दूर होताना दिसत नाही. शासनाकडून दुष्काळात शेतकरी यांची चेष्टा होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे.

मदतीची गरज

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पीक नुकसानभरपाई, पीकविमा, दुष्काळी सवलती आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. हातात पैसा नसताना सण साजरा करण्याची वेळ आल्याने यंदाची दिवाळी अनेक शेतकरी कुटुंबांसाठी आनंदापेक्षा आर्थिक विवंचनेची ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT