तीर्थपुरी: शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य सन्मान देत साखर कारखान्यांनी ऊसाला 3 हजार 550 रुपये प्रतिटन एफआरपी द्यावा, अन्यथा युवा शेतकरी संघर्ष समिती तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशारा गुरुवारी तीर्थपुरी येथे आयोजित इशारा मेळाव्यात देण्यात आला. मेळाव्यात उपस्थित शेतकरी नेत्यांनी कारखानदारांच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलतांना राजन क्षीरसागर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांकडून ऊसाचे पैसे वेळेत दिले जात नाहीत. कारखान्यांनी दर न दिल्यास कारवाईची तरतूद असतानाही प्रत्यक्षात कारवाई होत नाही.
तेलंगणा व पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला चांगला दर मिळतो. मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऊस म्हणजे पृथ्वीतलवरील कल्पवृक्ष असून शेकडोच्यावर उत्पादने उसापासून तयार केली जातात.
त्यामुळे कारखानदारांना भाव देण्यास कुठलीही अडचण नसली पाहिजे. लागवडीसाठी वाढणारा खर्च खते, बियाणे, मजुरी, पाणी, वीज, ट्रॅक्टर व सिंचन खर्च प्रचंड वाढले असताना ऊसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
रास्ता रोको करणार
ऊसाला 3 हजार 550 रुपये प्रतिटनाचा भाव न दिल्यास रास्ता रोको, ऊसतोड व वाहतूक बंद, कारखाने बंद पाडण्याचा इशारा यावेळी शेतकरी नेते जगदीश फरताडे यांनी दिला. यावेळी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.