परतूर (जालना) : परतूर तालुक्यातील मसला शिवारात महावितरणच्या वीज तारेचा स्पर्श होउन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.
परतूर तालुक्यातील मसला शिवारात शेतकरी संदीप भालेकर यांच्या शेतात गेल्या अनेक दिवसांपासून शेतात विजेच्या तारा अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. याबाबत त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विजेच्या तारांचा शॉक लागून संदीप भालेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी तत्काळ महावितरणचे कार्यकारी अभियंता मठपती यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तसेच, अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विजेच्या तारांची नियमित तपासणी आणि देखभाल यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देश लोणीकर यांनी दिले आहेत. आमदार बबनराव लोणीकर यांनी संदीप भालेकर यांच्या कुटुंबाला महावितरणने तत्काळ नुकसानभरपाई आणि आवश्यक आधार देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पारदर्शक तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांची अपेक्षाही लोणीकर यांनी व्यक्त केली आहे.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचा बळी गेला आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे. अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या आहे.