जालना ः बोगस कामगार नोंदणी आणि विविध योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या वतीने दक्षता पथकाच्या माध्यमातून उलट तपासणी करण्याचा निर्णय केला आहे. जालना जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर येथील दक्षता पथक झाडाझडती घेणार आहे. यामुळे जिल्हाभरातील दलालांचे धाबे दणाणले असून, ही उलट तपासणी 10 जुलैपर्यंत करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या योजनांमध्ये बोगस कागपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करणार्या दलालांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे दलाल, एजंटांचे आणि त्यांना पाठीशी घालणार्या कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये बोगस कादपत्रांच्या आधारे बोगस कामगारांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दलाल, एजंटांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. काही ठिकाणी या दलालांनी कामगारांच्या नावाने संघटना सुरू केल्याचे भासविले जात आहे. यातून बनावट कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देत त्यांच्याकडून मोठया प्रमाणात पैसे उकळले जातात. याकडे कामगार अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते. दरम्यान, कामगार कल्याण मंडळाच्या योजनांवर दलालांकडून डल्ला मारला जात असल्याने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या अनागोंदीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत त्यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, किट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालयप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक नेमण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसर्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावीपणे केली जाईल.
ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात 10 जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे बांधकाम कामगारांची फसवणूक करणार्या दलालांवर प्रभावी आळा बसणार आहे.
बोगस नोेंदणीला बसेल चाप दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील दलालांचे धाबे दणाणले आहे.