घनसावंगी ः उन्हाच्या तीव्रतेमुळे पीके करपू लागली आहे.  pudhari photo
जालना

Ghansawangi heatwave impact : उन्हाच्या तीव्रतेने शेतीपिके करपू लागली

घनसावंगी ः ऊस पिकाला मोठा फटका, सततच्या संकटाने तालुक्यातील शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

अविनाश घोगरे

घनसावंगी ः तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून वाढत्या तापमानाचा फटका आता थेट शेतीपिकांना बसू लागला आहे. मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून बागायती पिके देखील उष्णतेसमोर हतबल होत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. विशेषतः ऊस पिकाचे शेंडे करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील अनेक भागातून गोदावरी नदी वाहते. नदीपात्रात विविध ठिकाणी बंधारे बांधण्यात आले असून या बंधाऱ्यांमध्ये सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच तालुक्यात अनेक छोटे-मोठे लघु तलाव असल्याने परिसरात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

पाण्याची उपलब्धता असल्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून अनेक शेतकरी ऊस पिकावर अवलंबून आहेत. मात्र, यंदाच्या तीव्र उन्हामुळे उपलब्ध पाणीही पिकांना पुरेसे ठरत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सध्या तालुक्यात तापमान 41ते 43अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक वाढत आहे. या प्रचंड तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. शेतकरी पिकांना नियमित पाणी देत असले तरी पाणी दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पिके कोमेजल्यासारखी दिसत आहेत. अनेक ठिकाणी उसाचे शेंडे सुकून करपल्याचे चित्र दिसून येत आहे.

उष्णतेमुळे शेतीपिकांचे पाण्याचे शोषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला असून वीजबिल आणि सिंचनासाठी लागणारा खर्चही अधिक वाढत आहे. अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी मोटारी सुरू करून पिकांना पाणी देत आहेत. तरीदेखील पिके तग धरायला तयार नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

विशेषतः ऊस पिकावर याचा मोठा परिणाम होत आहे. ऊसाच्या पानांचा हिरवागारपणा कमी होत असून शेंडे सुकत चालले आहेत. काही ठिकाणी फळबागांवरही उन्हाचा परिणाम दिसून येत असून भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. याचा परिणाम उत्पादनावर होऊन आर्थिक नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होते.

नुकसान होण्याची शक्यता

हवामानातील बदल आणि वाढते तापमान यामुळे शेती व्यवसाय अधिकच संकटात सापडत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. पुढील काही दिवस तापमानात घट झाली नाही, तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी आता आकाशाकडे आशेने पाहत असून उन्हाचा तडाखा कमी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

ऊन एवढं वाढलंय की पिकाला सारखं पाणी द्यावं लागतंय. पण लाईटच जास्त वेळ टिकत नाही. दोन-दोन तासांनी लाईट जाते, त्यामुळे पिकाला व्यवस्थित पाणी देता येत नाही. उसाचे शेंडे करपायला लागलेत. खर्च वाढतोय आणि पिकं हातातून जात आहे.
आण्णासाहेब मरकड, बोडखा बु

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT