Eicher's fatal accident; A 4-year-old girl died on the spot, two others were seriously injured
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना-देऊळगाव राजा मार्गावर वरखेड फाट्या जवळ एका भरधाव आयशर ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत ४ वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे. या भीषण अपघातात मृत मुलीची काकू आणि मोटारसायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाले आहे.
फिर्यादी सतीश नामदेव शेवाळे (वय २०, रा. वरखेडा सिं., ता. जि. जालना) हे शिक्षण घेतात. बुधवार, दि.११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या ४ वर्षांच्या पुतणी आराध्या विठ्ठल शेवाळे हिच्या पोटात दुखत असल्याने, सतीश हे आपली काकू वर्षा विठ्ठल शेवाळे आणि आराध्या यांना मोटारसायकलने (क्रमांक एमएच २१, झेड १२१) उपचारासाठी देऊळगाव राजाकडे जात होते.
ते वरखेडा फाट्याच्या पुढे सुमारे ६:३० वाजेच्या सुमारास आले असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकच्या (क्रमांक एमएच १३, एएक्स ३१४६) चालकाने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे मोटारसायकलवरील सर्वजण रस्त्याच्या कडेला भिरकावले गेले.
रस्त्यावर पडल्याने ४ वर्षांची आराध्या विठ्ठल शेवाळे हिच्या डोक्याला गंभीर आणि मार लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. सतीश शेवाळे यांच्या हाताला व खांद्याला दुखापत झाली, तर काकू वर्षा शेवाळे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर आयशर चालक पळून गेला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमींवर उपचार सुरू
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने खासगी रिक्षाने जालन्यातील उपचारासाठी दाखल करण्यात आले, जिथे आराध्या मृत घोषित करण्यात आली. या प्रकरणी सतीश शेवाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.