रावसाहेब दानवे  File photo
जालना

Raosaheb Danve‌ : ‘ड्रायपोर्ट‌’ची मालवाहतूक महिनाभरात सुरू !

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची महिती

पुढारी वृत्तसेवा

जालना : केंद्रीय महामार्ग यंत्रणेमार्फत ड्रायपोर्टसाठी आलेल्या सहा निविदांपैकी विकास कोल अँड मिनरल्स प्रा.लि. या कंपनीची निविदा स्वीकारल्याने ड्रायपोर्टवरून प्रत्यक्षात आयात निर्यातीस प्रारंभ होऊ शकणार असून महिनाभरात मालवाहतूक सुरू होईल अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

जालना येथे देशातील पहिला ड्रायपोर्ट उभारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात तत्कालीन भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून मंजूर झाला होता. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरचे टप्पे जवळपास पूर्ण झाले असून दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय महामार्ग यंत्रणेमार्फत आलेल्या सहा निविदांपैकी विकास कोल अँड मिनरल्स प्रा.लि. या कंपनीची निविदा स्वीकारल्याने ड्रायपोर्टवरून प्रत्यक्षात आयात निर्यातीस प्रारंभ होऊ शकतो.

19 फेब्रुवारी रोजी ड्रायपोर्टच्या ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट संदर्भातील निविदा उघडण्यात आली. त्यामध्ये एल- 1 म्हणून नागपूर येथील विकास कोल ॲण्ड मिनरल्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदरील कंपनी सोबत करार करून आठ दिवसांच्या आत कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून, त्यानंतर एक ते दोन महिन्यात प्रत्यक्ष मालवाहतूक प्रक्रिया सुरू होईल.जालना शहरालगत जवळपास चारशे एकर परिसरावर या ड्रायपोर्टची उभारणीचे काम2016 पासून सुरू झाले. प्रारंभी चारशे एकर जमीन संपादित करून त्याला संरक्षणभिंत बांधण्यात आली.

मध्यंतरीच्या काळात रेंगाळलेला हा प्रकल्प ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट स्टच्या अधिकाऱ्यांना जालन्यात बोलावून प्रकल्पाला गती दिली. विशेष म्हणजे कस्टम क्लिअरन्स हा आयात आणि निर्यातीसाठी लागणारा महत्त्वाचा घटक याआधीच मंजूर झालेला आहे. आजघडीला 64 एकरवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असून जालना तालुक्यातील दिनेगाव ते ड्रायपोर्टपर्यंत स्वतंत्र रेल्वे रूळ अंथरलेले आहेत. आयात-निर्यातीसाठी मालधक्का देखील तयार आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ड्रायपोर्टचे व्हर्च्युअल उद्घाटन केले होते. त्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, आ.अर्जुन खोतकर यांचीही उपस्थिती होती.

विविध प्रशासकीय प्रक्रियामुळे हा प्रकल्प काही वर्ष प्रलंबित राहिला होता. त्यामुळे प्रत्यक्षात या ड्रायपोर्टच्या माध्यमातून मालाची ने आण सुरू झाली नव्हती. त्यासाठी अनेक वेळा निविदा मागविण्यात आल्या. मध्यंतरी जेएनपीटी प्रशासनाकडून हा प्रकल्प केंद्रीय महामार्ग रस्ते विकास मंडळाकडे वर्ग करण्यात आला. याच मंडळाने या निविदा मागविल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी सहापैकी विकास कोल अँड मिनरल्स प्रा.लि. यांची निविदा मंजूर झाली असून या कंपनीकडून आता पुढील पंधरा वर्षांसाठी जालन्याचे ड्रायपोर्टचे संचालन करण्याची जबाबदारी राहणार आहे.

यापोटी ही कंपनी एमएमएलपी अर्थात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क या कंपनीला दरवर्षी एकूण उलाढालीच्या तुलनेत दीड कोटी रुपये देणार आहे. साधारणपणे महिनाभरात या कंपनीला ड्रायपोर्टचे संचालन करण्यासाठीचे प्रशासकीय मान्यता देऊन त्यांच्याकडून बँक गॅरंटी घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ जालना जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी विकासाचे मोठे पाऊल ठरणार आहे.

ड्रायपोर्ट कार्यान्वित झाल्यानंतर राज्यांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मालवाहतुकीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. यामुळे लॉजिस्टिक्स खर्चात बचत होऊन कृषी व औद्योगिक उत्पादनांना स्पर्धात्मक दरात राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल.

प्रत्यक्षात काम सुरू होणार असल्याचा आनंद- दानवे

जालन्यात ड्रायपोर्ट सुरू व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच तत्कालीन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर जालन्यात हा ड्रायपोर्टचा प्रकल्प मंजूर झाला. पुढील महिन्यात निविदा मंजूर केलेल्या विकास कोल अँड मिनरल्स प्रा.लि. कडून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल यात आता शंका राहिली नाही. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासह मोठ्या कंपन्यांसह शेतकऱ्यांना लाभ होईल याचे समाधान आणि आनंद असल्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT