Drinking Water Alarm Bell!; 698 samples impure in six months
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत तपासलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी तब्बल ६९८ नमुने दूषित आढळले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक गंभीर असून, तपासण्यात आलेल्या ६ हजार ७११ नमुन्यांपैकी ६४२ नमुने (९.६ टक्के) पिण्यास अयोग्य ठरले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक दहावा पाण्याचा नमुना दूषित असल्याचे धक्कादायक वास्तव या अहवालातून समोर आले आहे.
जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा तसेच ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रे, हॉटेल्स आणि विविध संस्थांकडून पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शहरी भागात तपासण्यात आलेल्या १ हजार ४५३ नमुन्यांपैकी ५६ नमुने (३.९ टक्के) दूषित आढळले.
प्रश्न महिनानिहाय आकडेवारीनुसार ग्रामीण भागात जानेवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांत दूषित नमुन्यांचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा अधिक राहिले. विशेषतः मे महिन्यात १०.४ टक्के नमुने दूषित आढळल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा अधिक गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, दूषित पाणी हा केवळ गुणवत्तेचा प्रश्न नसून सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका आहे. अशा पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, टायफॉईड, कॉलरा, कावीळ, उलट्या-जुलाब तसेच पोटाच्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला,ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, जलस्रोतांची स्वच्छता, योग्य क्लोरीनेशन, पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल आणि सुरक्षित साठवण यावर भर देणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
निर्जंतुकीकरण गरजेचे पिण्याच्या पाण्यात कोलीफॉर्म आणि ई-कोलाय हे जीवाणू आढळल्यास ते पाणी दूषित मानले जाते. हे जीवाणू भूगर्भातील दूषित घटक किंवा मानवी-प्राण्यांच्या विष्ठेमुळे पाण्यात येतात. अशा पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढतो. पाण्याची नियमित तपासणी, निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.- अनिरुद्ध दप्तरे, कनिष्ठ वैज्ञानिक, जालना