मला धमक्‍या देऊ नका, मनोज जरांगेंचा राणेंना इशारा File Photo
जालना

Manoj Jarange Patil : मला धमक्‍या देऊ नका, मनोज जरांगेंचा राणेंना इशारा

निलेश पोतदार

वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा

निलेश राणे यांनी वडिलांना समजून सांगावं. मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. बोलायला लागलो, तर थांबणार नाही. फुकट धमक्या द्यायच्या नाहीत. मी कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही, मी त्यांना मराठवाड्यात येऊ नका असं म्‍हटलं नाही. त्यांना मी दादा म्हणतो. तुम्ही माझ्याकडे काय बघणार. तुम्ही मराठवड्यात या मी तुम्हाला दाखवतो असं तुम्हाला म्हणालो का? मी बघायला लागलो तर तुमची कोकणात फजिती होईल. तुम्हाला कोकणातही फिरता येणार नाही. मी राणे साहेबांना मानतो. निलेश राणे यांनी त्यांना समजावून सांगावे, मला धमक्या देऊ नका असा इशारा जरांगे यांनी राणे यांना दिला. ते आज अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

खा. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले होते की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, गणेशोत्सव संपताच मी मराठवाड्यात चाललो आहे. सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी मराठवाड्यात जाणार आहे. तुम्ही कुणी यावं नाही यावं, मी जाणार आहे. बघू तर जरांगे पाटील काय करतो असं म्हणत खा. नारायण राणे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ललकारलं आहे.

खा. नारायण राणे यांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी नारायण राणे यांना मराठवाड्यात येऊ नका, असं बोललोच नाही. ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहे. मी नारायण राणे यांचा आदर करतो. मी तर म्हणालो नाहीच की तुम्ही मराठवाड्यात येऊ देणार नाही, तर कोकणात सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाही. मी लक्ष घातले, तर खूप फजिती होईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी खा. नारायण राणे यांना दिला.

पुढे बोलतात ते म्हणाले की, २० सप्टेंबर आचारसंहिता लागेल. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जरांगे पाटील म्हणाले की, हा विषय कन्फ्युज करणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाचा १४ ते २० ऑक्टोबर पर्यत डाटा आणावा. आमचीही तयारी सुरू झाली आहे. जे उमेदवार असतील त्यांनी कागदपत्रे काढून ठेवा. २९ ऑगस्टला पाडायचं की लढायचं हे ठरणार आहे. त्यामुळे आधीच तयारी करुन ठेवा. एका मतदार संघातून एकच उमेदवार लढेल. एकदा एक उमेदवार ठरला तर बाकीच्यांनी मागे राहण्याची तयारी ठेवा.

२८८ जागा लढवणार का यावर बोलताना ते म्हणाले की, २९ तारखेपर्यत काहीच सांगणार नाही. बोलणार, राखीव जागाही लढणार तिथे राखीवच लढतील. निवडणूक लढण्यासाठी कागदपत्रांची तयारी ठेवा.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाटील यांची सरकारशी मिली भगत आहे असा आरोप केला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, मी ओबीसीतून आरक्षण घेणार, त्यांचा आम्ही आदर करतो. ते नवीन काय काढायला लागले मला माहित नाही. गोर गरीबांच कल्याण होईल असंच पाऊल मी उचलतो.

भाजप नेते आ.राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तेही उठले का आता अभियानात. लोक त्यांना चांगले मानतात, त्यांनी फुकट यांच्यात उडी घेऊ नये. तुमच्या नेत्याने किती वेळा आरक्षण देऊन घालवले हे सांगू नये. सत्ताधारी लोकांना काही सुचेना आता. हे दिवस रात्र भाकरी न खाता फक्त ताक पितात हे मला उचकावत आहे. यांना संताजी धनाजीसारखा मी दिसायला लागलो आहे.

ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही, आधीच्या मराठ्यामुळे देखील नाही. धनगरांना एसटीतून आरक्षण मिळणार. आमचं हे आंदोलन देखील सुरू आहे. आता राजकारणाचं आंदोलन देखील सरकारसोबत खेळणार आहे.

वर्षभर आंदोलन टिकवणं व सुरू ठेवण सोप नाही, फडणवीस यांनी दरेकर यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यानं आमच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सभेला तसेच कार्यक्रमात मराठ्यांनी जाऊ नये, यांच्या रणधुमाळीत मराठे दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

तिसऱ्या आघाडी बाबत बोलताना ते म्हणाले की, आपलं अपक्षच बरं आहे. कोणत्याही आघाड्या पक्ष नको. आघाड्या म्हणजे दुकान आहे. मराठ्यांची शान राहिली पाहिजे, असं मराठ्यांनी अपक्ष उमेदवारांना मतदान करावं. जो नेता मतदान मागायला येईल त्याला आम्हाला आरक्षण दे म्हणावं.

आमदार मतदान मागायला आले की, त्यांना सर्व गॅझेट बाबत प्रश्न विचारा, ओबीसीतून आरक्षण देतो का असंही विचारा, ओबीसीतून मराठयांना आरक्षण दिल्यानंतर ओबीसीचं मतदान फुटतं असं सांगणाऱ्या आमदारांना मतदान करू नका. नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा मुलांच्या पाठिशी उभे राहा असे ते म्‍हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT