Pre-Monsoon Preparations : मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज file photo
जालना

Pre-Monsoon Preparations : मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचावाची रंगीत तालीम

पुढारी वृत्तसेवा

District Administration Ready for Pre-Monsoon Preparations

जालना, पुढारी वृत्तसेवा : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी यासाठी अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभागांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची भव्य रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा अपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर, अग्नीशमन अधिकारी संदीप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना, बदनापूर व अंबड येथील अग्नीशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच रायगड येथे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले 'आपदा मित्र' मोठ्या संख्येने रंगीत तालमीत सहभागी झाले होते.

रंगीत तालीमदरम्यान पूर, अतिवृष्टी, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा बचाव, आपत्कालीन स्थलांतरण तसेच नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक शोध व बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

यामध्ये फायबर बोट, इन्फ्लाटेबल रबर बोट, स्कुबा सेट, फायर जेल ब्लॅकेट, लाईफबोये, बॅटरी कटर, बॅटरी स्प्रेडर, फ्लोटींग पंप, पोर्टेबल जनरेटर, पोर्टेबल पंप, मेगाफोन, सेफ्टी नेट, लाईफ जॅकेट व रिफ्लेक्टर जॅकेट आदी साहित्यांच्या कार्यपद्धती व वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचा सुरक्षितरित्या बचाव कसा करावा, पूरस्थितीत रबर बोटीद्वारे नागरिकांचे स्थलांतरण कशा पद्धतीने करावे, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधून तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा याबाबत अग्निशमन विभागामार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

यंत्रणामधे समन्वयासाठी तालीम

मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत असून, अशा प्रकारच्या रंगीत तालीम व प्रशिक्षण उपक्रमांमुळे आपत्ती प्रतिसाद यंत्रणांमध्ये समन्वय, तत्परता व कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT