Dhangar community's front for reservation demand
जालना, पुढारी वृतसेवा :
धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बुधवारी जालना शहरात धनगर समाज बांधवांच्यावतीने राज्यव्यापी इशारा मोर्चा गांधी चमन येथून काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने समजाबांधव सहभागी झाले होते.
यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, देत कसे नाय, घेतल्याशिवाय राहात नाय, देवा भाऊ क्या हुआ तेरा वादा अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.
जालना शहरात गेल्या सात दिवसांपासून धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बो-हाडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. धनगड आणि धनगर या शब्दात गफलत झाली असून, धनगड आणि धनगर एकच आहेत.
धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी राज्यव्यापी इशारा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी सकाळपासूनच समजाबांधवांनी गर्दी केली होती. महिलांसह येणारे समाजबांधव गांधी चमनच्या दिशेने जाताना दिसून आले. मोर्चात भूषणसिंह राजे होळकर, दीपक बोऱ्हाडे यांच्यासह आ. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, घनशाम हाके, महेश बिंडगर, कोंडु वाघमोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.