Crime News: Drunken husband creates a ruckus in Bhatodi; beats wife with a stick
जालना, पुढारी वृत्तसेवाः मद्यधुंद पतीने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत लाकडी काठीने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पत्नीला नेण्यासाठी आलेल्या सासरा आणि भावाच्या अंगावर कुऱ्हाड उगारून जीवे मारण्याची धमकी देत भावाच्या कारची काच फोडून १० हजारांचे नुकसान केल्याची खळबळजनक घटना दि. २३ जुलै रोजी घडली. याप्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अर्चना शरद भोरे (वय ३६, रा. भातोडी, ता. जाफराबाद) या पती शरद रामनाथ भोरे (वय ४०) यांच्यासोबत राहत असून शेतीची कामे करतात. त्यांना रेणुका नावाची १६ वर्षांची मुलगी असून तिचे शिक्षणासाठी मामाकडे वास्तव्य आहे. आरोपी पती शरद भोरे याला दारू पिण्याचे व्यसन असून तो दररोज दारू पिऊन आल्यानंतर पत्नीला विनाकारण मारहाण करत असे. त्यावेळी आरोपी शरद भोरे याने सासरा व भावाला शिवीगाळ केली आणि थेट भावाच्या अंगावर कुऱ्हाड घेऊन धावला.
दरम्यान, चुलत सासरा बालाजी भोरे व चुलत सासू नंदाबाई भोरे यांनी मध्यस्थी करून सोडवाजोडव केली. त्यानंतर संतापलेल्या पतीने हातातील कुऱ्हाडीने कारची समोरील काच फोडून १० हजार रुपयांचे नुकसान केले.
या प्रकरणी पीडित पत्नी अर्चना शरद भोरे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११५ (२), ११८(१), ३२४(२), ३५१(२), ३५१ (३) व ३५२ नुसार पती शरद रामनाथ भोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब शिवाजी खर्डे करत आहेत.
रात्री दहा वाजता झाली मारहाण
मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या शरद भोरे याने पत्नी अर्चना यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अर्चना यांना घेण्यासाठी त्यांचे भाऊ नितीन भगवानराव केसकर व वडील भगवानराव केसकर हे कारने (क्रमांक एमएच २०, इवाय ५६६७) आले.