Congress Insults Parliament and the Nation: Bhaskarrao Danve
जालना, पुढारी वृत्तसेवा : संसदेत १२ मार्च २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेटचे कामकाज सुरू असताना काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षातील काही खासदारांनी संसद परिसरात चहा-बिस्कीटसह चायपार्टी आयोजित केली.
संसद ही देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था असताना अशा प्रकारचे कृत्य करणे हे अत्यंत दुर्दैवी असून संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. तसेच संसदीय नियम व अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ जालना भारतीय जनता पार्टी च्या वतीने शनिवार (१४) रोजी सायंकाळी भाजपा जिल्हा कार्यालय परिसरात काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे म्हणाले की, संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना काँग्रेस पक्षातील खासदारांनी संसद परिसरात चायपार्टी आयोजित करणे हे संसदीय परंपरेला धरून नाही.
लोकशाही संस्थांची प्रतिष्ठा राखणे ही सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना अशा प्रकारच्या कृत्यामुळे संसदेची मर्यादा भंग होते. संसदेचे नियम व अध्यक्षांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून केलेले हे कृत्य निषेधार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले.