जालना, पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक विभागाने शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२६-२७ मधील विविध विकासकामांची आढावा बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाल गुरुवार, दि. ९ रोजी नियोजन भवन येथे पार पडली.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सन २०२५-२६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या मात्र प्रत्यक्षात काम सुरू न झालेल्या सर्व योजनांचा विभागनिहाय आढावा घेऊन, अशा कामांची सद्यस्थिती, काम सुरू होण्यास झालेला विलंब आणि ती कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीत पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांनुसार कोणकोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याचा आढावा घेण्यात आला. सन २०२५-२६ आणि त्यापूर्वीच्या वर्षांतील विभागनिहाय मंजूर निधी, त्यातील खर्च, तसेच सन २०२३-२४ व त्यानंतरच्या वर्षांतील खर्च न झालेल्या निधीबाबत कारणांसह सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये हाती घेण्यात येणाऱ्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी बैठकीत विविध विभागांच्या योजनांची अंमलबजावणी, निधी खर्च, प्रलंबित कामे तसेच आगामी वर्षातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, नियोजन विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शाश्वत विकास ध्येयांतर्गत धोरणावर चर्चा सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा विकास आराखडा, गतिमान प्रशासन, व्यक्तिमत्त्व विकास, जिल्हा विकास आराखडा (महसूल व भांडवली) तसेच शाश्वत विकास ध्येय (SDG) अंतर्गत प्रस्तावित योजनांवरही सविस्तर चर्चा झाली. या योजनांचे प्रस्ताव वेळेत सादर करून विकासकामांना गती देण्याचे आवाहन करण्यात आले.
खर्चाची गती वाढवण्यावर दिला भर
सन २०२५-२६ मध्ये झालेल्या निधी खर्चाचा आढावा घेऊन खर्चाची गती वाढविण्यावर भर देण्यात आला. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करत शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार विकासकामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच उपलब्ध निधीचा शंभर टक्के विनियोग सुनिश्चित करावा आणि प्रलंबित प्रस्ताव व अहवाल विहित मुदतीत सादर करावेत, असे निर्देश दिले.
शाश्वत विकास ध्येयांतर्गत धोरणावर चर्चा
सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा विकास आराखडा, गतिमान प्रशासन, व्यक्तिमत्त्व विकास, जिल्हा विकास आराखडा (महसूल व भांडवली) तसेच शाश्वत विकास ध्येय (SDG) अंतर्गत प्रस्तावित योजनांवरही सविस्तर चर्चा झाली. या योजनांचे प्रस्ताव वेळेत सादर करून विकासकामांना गती देण्याचे आवाहन करण्यात आले.