Cattle on the road; Municipal Corporation is ignoring them
जालना, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या क्षेत्रात रस्त्यावर फिरणार्या मोकाट जनावरांचा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेकडून विविध योजना राबविल्या जातात. मात्र प्रत्यक्षात कृती न झाल्याने आजही शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर दिसून येत असून, त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट जनावरांनी आपल्या मागण्यासाठी जणू काही मुख्य चौकामध्ये ठिय्या आंदोलन केल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावरच वापर असल्यामुळे रहदारी ठप्प होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोंडवाडा असतांनाही मोकाट जनावरांचा बंदोबस्त महानगरपालिकेला करता येत नाही.
शहरात कामानिमित्त दररोज ग्रामीण व इतर जिल्ह्यातील नागरिक येतात. त्यामुळे शहरातील सिंधी बाजार, मामा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बडी सडक, कचेरी रोड, गांधी चमन, मस्तगड, कन्हैय्यानगर या परिसरात नेहमी वाहतूकीची वर्दळ असते. त्यातच शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी ठप्प होत आहे. कितीही हॉर्न वाजले, तरी सुध्दा जनावरे रस्त्याच्या बाजूला जात नाही.
त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रारी सुध्दा करण्यात आल्या आहेत. मात्र उपयोग झाला नाही. याकडे मुख्यधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
शहरातील विविध भागात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. जनावरांच्या उपद्रवामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. ही जनावरे मुख्य चौक पाहून त्या ठिकाणी आपला ठिय्या मांडतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अपघात होण्याची भीती
महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात. तसेच, रस्त्याच्याकडेला बसलेली दिसतात. रस्त्याच्याकडेला बसणाऱ्या या प्राण्यांना प्राणीप्रेमी खायलाही आणून देतात.
तर, काही खासगी मालकांच्या गायी, बैलही रस्त्यावर फिरताना दिसतात. मोकाट जनावरांबाबत पालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.