lightning strike File Photo
जालना

Lightning strike: वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकरी आर्थिक संकटात

भोकरदन तालुक्यातील पारध रामनगर (चौरीवाडी) परिसरात काल सायंकाळी वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध रामनगर (चौरीवाडी) परिसरात काल सायंकाळी वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक २०८ मधील शेतात बांधून ठेवलेल्या बैलावर अचानक वीज कोसळली. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. हा बैल तुषार फकीरा भुते (रा. पारध) यांच्या मालकीचा असून शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या घटनेत सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक अहवालात वीज पडल्यामुळेच बैलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

“माझ्यासाठी हा बैल फक्त जनावर नव्हता, तर कुटुंबातील सदस्यासारखा होता. त्याच्यावरच माझ्या शेतीचे सर्व काम अवलंबून होते. एका क्षणात वीज कोसळली आणि सर्व काही संपले. आता शेती कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे.”
तुषार भुते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT