Jalna News : शववाहिनीऐवजी पालिकेच्या कचरा गाडीतून नेले पार्थिव ! file photo
जालना

Jalna News : शववाहिनीऐवजी पालिकेच्या कचरा गाडीतून नेले पार्थिव !

येथे माणुसकी ओशाळली ! प्रशासनाचा निर्लज्जपणा अन् असंवेदनशीलता !

पुढारी वृत्तसेवा

Body transported in municipal garbage truck instead of a hearse!

परतूर, पुढारी वृत्तसेवा : जिवंत असताना माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतो, पण मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवाला सन्मान मिळायलाच हवा, हा निसर्गाचा नियम आहे. मात्र, परतूर शहरात घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने माणुसकीला पुरता काळीमा फासला आहे. बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर, त्याला सन्मानाने शववाहिनीतून नेण्याऐवजी चक्क नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परतूर शहर तीव्र संतापाने हादरून गेले आहे.

नगर दरम्यान, परतूर येथील हिरालाल परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणारे सुरेश ढाकरगे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नी उषा ढाकरगे यांनी दोन दिवसांपूर्वीच पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

दरम्यान, पाण्याच्या टाकीजवळ त्यांची दुचाकी आढळून आल्यानंतर पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम हाती घेतली असता, सुरेश ढाकरगे यांचा मृतदेह निष्प्राण अवस्थेत आढळून आला.

तरुणाचा मृत्यू झाल्याच्या दुः खापेक्षाही अधिक वेदनादायी आणि चीड आणणारी बाब म्हणजे, पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेण्याची वेळ आली. नियमानुसार अशा वेळी शववाहिनी किंवा रुग्णवाहिका बोलावणे गरजेचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, परतूर शहरात दोन-दोन रुग्णवाहिका आणि हक्काची शववाहिनी उपलब्ध असतानाही प्रशासनाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली. मृतदेह नेण्यासाठी चक्क नगरपालिकेची घाण आणि कचरा वाहून नेणारी गाडी मागवण्यात आली आणि त्यात मृतदेह टाकून तो रुग्णालयात हलवण्यात आला.

मृत व्यक्तीच्या पार्थिवाच्या झालेल्या या अमानुष विटंबनेमुळे परतूरच्या नागरिकांमधून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि असंवेद-नशीलतेवर तीव्र शब्दांत अंगावर काटा आणणारी टीका होत आहे. जीवंत असतानाही जगणे अवघड झाले होते. मृत्यू नंतरही संकटाने पाठ सोडली नाही. आता या प्रकरणी दोषी ठरणाऱ्या पालिकेच्या आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सामाजिक कार्यकर्त्याची आक्रमक भूमिका

या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी थेट उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांची भेट घेत संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT