जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड सर्कल आणि परिसरात भाजपला बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपचे आमदार नारायण कुचे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक असलेले प्रभावी कार्यकर्ते पंकज मंडलिक आणि पंचायत समिती सदस्य भगवान भोजने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.
हा 'ऐतिहासिक' प्रवेश जालना येथील मामा चौकात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली झाला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार हिकमत उढान यांच्यासह शिवसेना जालना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, उपाध्यक्ष भालचंद्र भोजने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भाजपची संघटनात्मक ताकद डळमळीत: मंडलिक आणि भोजने यांच्यासह शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे जामखेड सर्कलमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद डळमळीत झाली असून, राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत.
भाजपमध्ये स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांचे सतत दुर्लक्ष, विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि अंतर्गत नाराजी यामुळे मंडलिक यांनी अखेर शिंदे गटाचा भगवा झेंडा हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जनतेच्या हितासाठी आणि जामखेडच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे मत यावेळी पंकज मंडलिक यांनी व्यक्त केले. आमदार कुचे यांचे विश्वासू असलेले हे दोन्ही नेते पक्षातून बाहेर पडल्याने जामखेड सर्कलमध्ये भाजपला मोठे नुकसान होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.