पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या कडक उन्हाळ्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. जंगल परिसरातील नैसर्गिक शिवारात, वस्तीजवळ येत आहेत.
गेल्या आठवडाभरात परिसरातील शेतकऱ्यांना हरणे, रानडुकरे व मोरांचा कळप शेतातील ठिबकच्या पाईपजवळ, विहिरींभोवती दिसून आला. मात्र सर्वात चिंतेची बाब म्हणजे बिबट्याचा वावर. मध्यरात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले.
काही ठिकाणी कुत्री व शेळ्या बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी सांगतात की, सायंकाळी सहानंतर शेतात जाणे बंद केले आहे. लहान मुलांना घराबाहेर पाठवताना भीती वाटते. वनविभागाने परिसरात पिंजरे लावले असले तरी अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही.
ग्रामस्थांनी पाणी मिळाल्यास प्राणी मानवी वस्तीकडे येणार नाहीत. तसेच रात्रीची गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना एकटे शेतात न जाण्याचे, लहान मुलांची काळजी घेण्याचे व बिबट्या दिसल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे. वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
महावितरण कंपनीने दिवसा विजेचा पुरवठा करावा जेणेकरून जनावरांना शेतात पाणी भरण्यासाठी रात्रीचे जावे लागत नाही. त्यामुळे सध्या विहिरींना पाणी नसल्यामुळे विजेवर कुठलाही प्रकारचा का येत नाही त्यामुळे दिवसा लाईन सोडावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.नीलेश देशमुख, शेतकरी