आन्वा : भोकरदन तालुक्यातील विविध भागांमध्ये सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अळीमुळे पानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पिकाची वाढ खुंटत आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकरी आपल्या शेताची नियमित पाहणी करून अळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. मात्र काही ठिकाणी प्रादुर्भाव गंभीर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
तब्बल एक महिना उशिरा लागवड झाल्यामुळे व सध्याचे ढगाळ हवामान, पावसाने दिलेली ओढ यामुळे या किडीस पोषक वातावरण तयार झाले आहे. सोयाबीन पिकाची पाने इतकी कुरतडली आहेत की पानांची चाळण झाली आहे. दोन-तीन फवारण्या करूनही कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसह, उंटअळी, चक्रीभुंगा अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाच्या विलंबाने पिकांची वाढ खुंटली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी लावलेल्या मका पिकावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
ढगाळी वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. अळी पाने कुरतडून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सोयाबीन पिकांवर संकट
वातावरणातील बदलावामुळे व अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत पिकाचा हंगाम घेतो.परंतु या विविध संकटामुळे प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च होऊन ही उत्पन्न काहीच मिळत नाही. सोयाबीन पिकांवर यंदा विविध संकटाचा विळखा पडल्यामुळे सोयाबीनवरील आशा मावळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.