भोकरदन : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी १० किलो ७८० ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण ४,५९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २३ जुलै रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास मालखेडा ते आव्हाणा रोडवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सापळा रचला. या दरम्यान मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. पोलीस दिसताच पाठीमागे बसलेला आरोपी *सागर सोनुने* याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी आणि पोलीस मित्रांनी तात्काळ पाठलाग करून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे रामेश्वर महादू बावस्कर (रा. कोदा, ता. भोकरदन, जि. जालना),सागर संतोष सोनुने (रा. आडगाव भोंबे, ता. भोकरदन, जि. जालना अशी असून त्यांच्याकडून १० किलो ७८० ग्रॅम गांजा, YAMAHA FZ कंपनीची मोटारसायकल (क्र. MH 20 HM 0670) हे वाहन तसेच २ मोबाईल फोन असा एकूण ४,५९,५००/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींवर इतर राज्यांतही गुन्हे दाखल
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी सराईतपणे गांजाची तस्करी करणारे आहेत. त्यांच्यावर ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. भोकरदन पोलीस ठाण्यात NDPSAct, 1985 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधु, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी . नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सपोनि राहुल बांगर, पोउपनि पवन राजपूत, पोलीस कर्मचारी प्रशांत उबाळे, गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, गोपाल सतबन, शिवाजी जाधव, संदीप भुतेकर, लक्ष्मण रानगोते, सुरेश ढोरमारे, होमगार्ड हनुमंता पाडळे, छत्तरसिंग कायटे, पोलीस पाटील (आव्हाणा) आणि पोलीस मित्र अजय बोराडे यांच्या पथकाने केली.