भोकरदन पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध कारवाई pudhari photo
जालना

Bhokardan police action : भोकरदन पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध कारवाई

एकूण ४ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन : भोकरदन पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत १० किलो ७८० ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २३ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालखेडा–आव्हाना रोडवर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन संशयितांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, मागे बसलेला आरोपी सागर संतोष सोनुने याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी आणि पोलिस मित्रांनी पाठलाग करून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रामेश्वर महादू बावस्कर (रा. कोदा, ता. भोकरदन) आणि सागर संतोष सोनुने (रा. आडगाव भोंबे, ता. भोकरदन) अशी आहेत. त्यांच्याकडून १० किलो ७८० ग्रॅम गांजा, एमएच-२० एचएम-०६७० क्रमांकाची यामाहा एफझेड मोटारसायकल तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण ४.५९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक तपासात हे दोन्ही आरोपी सराईतपणे गांजाची तस्करी करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध ओडिशा आणि आंध्र प्रदेश राज्यांतही यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थांचा साठा कोठून आणला आणि तो कुठे विक्रीसाठी नेला जात होता, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबीरसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि राहुल बांगर, पोउपनि पवन राजपूत तसेच पोलिस कर्मचारी, होमगार्ड, पोलिस पाटील आणि पोलिस मित्रांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT