Bhokardan nagarpalika Election of special committees
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :
नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकातील बेबनावामुळे सोमवारी (दि.९) होणारी स्थायी व विशेष समित्यां गठीत करण्यासाठीची निवड प्रक्रिया प्रचंड गोंधळानंतर बारगळल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण तयारी करून बसलेले असतानासुद्धा सत्ताधारी नगरसेवकात एकमत झाले नसल्याची चर्चा होत आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्थायी व विषय समित्या गठीत करणे व सभापती पदाची निवडणूक घेणे, नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी आयोजित विशेष सभेसाठी सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी येथील नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभा घेण्याचे आदेश दिले होते.
सोमवारी स्थायी व विषय समित्या गठीत करणे व सभापती पदाची निवडणूक घेणे, विशेष सभा सोमवार (दि.९) रोजी आयोजीत करण्यात आली होती. स्थायी व विशेष समित्यांच्या सभापती निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गटनेते शफिक पठाण आणि याच पक्षाचे अजहर अली शाह भोकरदन : विशेष समित्यांच्या निवडणूकप्रसंगी पालिकेत गोंधळ झाला.
इतर काही नगरसेवकांना एकच बांधकाम समिती पाहिजे होती, यावरून देखील यांच्यामध्ये बाचाबाची झाली. सभागृहातील २१ नगरसेवकांनी ही निवडणूक पार पाडण्यासाठी पीठासन अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी वी. सर्वनन यांच्याकडे नावाची सूची दिली होती. मात्र ऐनवेळी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाने देखील आम्हाला दोन सभापतिपद द्या अशी मागणी केली. त्यामुळे देखील आणखी गोंधळात भर पडला.
याशिवाय काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनीदेखील याही वेळी भाजपची अप्रत्यक्षरीत्या साथ धरल्याचे दिसून आले. दरम्यान स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापती आणि पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी आणलेले हार-तुरे याचे काय करायचे असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता.
नगरपालिकेतील पक्षीय बलाबल पाहता नगराध्यक्ष व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे असून याच पक्षाचे एकूण दहा नगरसेवक आहेत तर भारतीय जनता पक्षाकडे शिवसेना शिंदे गट असे मिळून नऊ नगरसेवक आहेत. आणि काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक आहेत. उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यानंतर आता सोमवारी होणाऱ्या य निवडीसाठी काय होते याकडे लक्ष लागले होते. यावेळी नगरसेवक यांची उपस्थिती होती.
आता पुढे काय
स्थायी व विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडीसाठी बोलावलेली विशेष बैठक बारगळल्याने कोणाचीच निवड झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पालिकेत सत्ता असूनही नाचक्की झाल्याचे मानण्यात येत आहे. याशिवाय आता या निवडणुका बारळल्याने पुढे काय अशी चर्चा होत आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागवणार असल्याचे त्यांनी सांगितले.