पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे अन्न प्रशासन विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगत व्यापाऱ्यांना कारवाई करण्याची धमकी देत एका तोतयाने दुकानदारांकडून शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर इसम अन्न प्रशासन विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत मिरची बाजार परिसरातील पानपट्टीसह इतर व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये गेला. यावेळी त्याने तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना घाबरवून दुकानदाराकडून १००, २०० आणि ५०० रुपयांपर्यंत रक्कम गोळा केली.
तोतया जवळ कोणतेही ओळखपत्र किंवा शासकीय गणवेश नव्हता. मात्र 'कारवाई करू' अशी धमकी देत त्याने दुकानदारांना घाबरवीत पैसे उकळले. काही वेळानंतर हा प्रकार इतर व्यापाऱ्यांच्या लक्षात आला. यावेळी पकडले जाण्याच्या भीतीने तोतया तेथून पळ काढला. या घटनेमुळे गावातील व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावाने फसवणूक होत असल्याने काही सुज्ञ नागरिकांना लक्षात आले. या बाबत विचारणा केली असता अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, पिंपळगाव रेणुकाई परिसरात तपासणीसाठी आमचा कर्मचारी गेलेला नाही.