भोकरदन : पुढारी वृत्तसेवा
जुन्या वादाच्या कारणावरून गरम लोखंडी रॉडने अंगाला चटके देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी जानेफळ गायकवाड (ता. भोकरदन) येथील दोघांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २७) विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे.
अनवा (ता. भोकरदन) येथील कैलास गोविंदा बोराडे (वय ३६) बुधवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी नवनाथ सुदाम दौड, सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौड (रा. जानेफळ गायकवाड) यांनी जुन्या वादातून लोखंडी रॉड चुलीत तापवून कैलास बोराडे यांच्या पायाला, पोटाला, मानेवर, हाताच्या तळव्यावर चटके दिले.
तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमा केल्या. शिवाय हाताचापटाने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी कैलास गोविंदा बोराडे यांनी पारध पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २७) फिर्याद दाखल केली. पोलिसांनी नवनाथ दौड, सोनू दौड यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करत आहेत.