पारधः भोकरदन तालुक्यातील पारध–पद्मावती मार्गावर शुक्रवारी कार ज्यान विहिरीत पडली होती ती विहीर. दुसऱ्या छायाचित्रात विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली.  (छायाः सागर देशमुख)
जालना

Bhokardan Accident : बारा तासांच्या प्रयत्नानंतर अखेर क्रेटा कार विहिरीतून बाहेर

दुचाकीस्वाराला धडक; आपत्कालीन यंत्रणांना उशीर झाल्याने संताप

पुढारी वृत्तसेवा

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध–पद्मावती मार्गावर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळलेली क्रेटा कार तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतून बाहेर काढण्यात आली. विहिरीतील पाण्याची खोली मोठी असल्याने रात्रीच्या अंधारात बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. अखेर स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने कार बाहेर काढण्यात यश आले.

भोकरदन तालुक्यातील पारध–पद्मावती मार्गावर शुक्रवारी रात्री ही भीषण घटना घडली होती दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रेटा रस्त्याच्या कडेला घेतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली. कार विहिरीत कोसळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्रीचा अंधार, विहिरीतील मोठ्या प्रमाणातील पाणी आणि बचावासाठी आवश्यक साधनांचा अभाव यामुळे बचावकार्यात मोठा विलंब झाला. स्थानिक नागरिकांनी रात्रभर प्रयत्न केले. अखेर स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर, पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने, तसेच तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य राबविण्यात आले. स्थानिक पोलिस कर्मचारी, महसूल प्रशासन, नागरिक तसेच स्कुबा डायव्हर्सच्या पथकाने अथक प्रयत्न करून तब्बल १२ ते १३ तासांनंतर क्रेटा विहिरीबाहेर काढली.

क्रेटा बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या अक्तर बेगम अमन उल्ला खान यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, अपघातातील जखमी सुलताना बी. बेगम यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. यावेळी मोठया संख्येने नागरीक व पोलिस घटनास्‍थळी उपस्थीत होते.

प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पारध परिसरात मोठी लोकवस्ती असूनही गंभीर अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या दुर्घटनेत बचावकार्यासाठी बाहेरून स्कुबा डायव्हिंग पथकाची मदत घ्यावी लागल्याने प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अपघातानंतर जीव वाचविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रात्रभर प्रयत्न केले. मात्र, अत्याधुनिक बचाव यंत्रणा वेळेत उपलब्ध न झाल्याने बचावकार्य लांबले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT