बनकिन्होळा (जालना) : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे दरवर्षी बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पाडवा भरविण्यात येतो. बनकिन्होळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाडवा भरवण्याची सुरू असलेली ही रूढी परंपरा कायम चालू राहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. २३) गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची शिकवण देणारे ग्रामदैवत शहा कलंदर बाबा यांच्या दर्गा परिसरात पाडवा भरवण्यात आला.
उसाच्या मुळ्या लुटत आगळा-वेगळा पाडवा साजरा करण्यात आला. पाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता शेतकऱ्यांनी आपल्या जवळील बैल, गाय, म्हैस, बकऱ्या ही जनवारे आणून ग्रामदैवत शहा कलंदर बाबा यांच्या दर्गाला पाच प्रदक्षिणा मारून बाबांचे दर्शन घेतात. विशेष म्हणजे हा पाडवा भरण्यासाठी गावकरी लोक वर्गणी जमा करून उसाच्या मुळ्या विकत आणतात. तसेच काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जनावरांना खाण्यासाठी थोड्याफार प्रमाणात ऊस लागवड केला आहे. असे शेतकरीही एक किंवा दोन उसाच्या मुळ्या आणतात. त्या आणलेल्या उसाच्या मुळ्या ग्रामदैवत शहा कलंदर बाबा यांच्या दर्गा परिसरातील नदीकाठावरुन ह्या उसाच्या मुळ्या फेकून पाडवा साजरा करण्यात आला.
या फेकलेल्या उसाच्या मुळ्याची लूट करण्यासाठी यावेळी बालगोपाल, युवक व ग्रामस्थांनी उसाच्या मुळ्या लुटण्याचा प्रयत्न केला. ह्या लुटलेल्या उसाच्या मुळ्यांचा प्रसाद म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा राजाला खाण्यासाठी घरी घेऊन जातात. हा आगळावेगळा भरवण्यात आलेला पाडवा पाहण्यासाठी तसेच शहा कलंदर यांचे दर्शन घेण्यासाठी यावेळी बनकिन्होळ्यासह परिसरातील गर्दी केली होती. पाडवा शांततेत पार पाडण्यासाठी आजी माजी सरपंच, उपसरपंच, पत्रकार बांधव, माजी सैनिक, सेवा सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रा.प. सदस्य, शालेय समिती अध्यक्ष व सदस्य आदी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, नवयुवक मंडळ आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
बनकिन्होळा येथील पाडवा तालुक्यात प्रसिध्द आहे. उसाच्या मुळ्या लुटण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गदी केली होती. अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.