बदनापूर : बदनापूर शहरातून जाणाऱ्या जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दुकानांची फलके आणि फेरीवाल्यांमुळे प्रचंड अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या अनुषंगाने बदनापूर नगरपंचायत आणि बदनापूर पोलिस प्रशासनाच्या वतीने गुरुवारी (ता. १४) संयुक्तरीत्या अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. आगामी सण - उत्सवात होणारी गर्दी पाहता महामार्गावरील अतिक्रमण काढणे आवश्यक होते, असे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सांगितले.
या मोहिमेत पोलिस निरीक्षक श्री. सुरवसे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील, नगराध्यक्ष वैशाली विजय जऱ्हाड, भाजपचे गटनेते बाबासाहेब कऱ्हाळे, नगरसेवक पद्माकर जऱ्हाड, गोरखनाथ खैरे, विलास जऱ्हाड आदींसह पोलिस कर्मचारी आणि नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
या महामार्गावर फळ विक्रीच्या हातगाडी, रिक्षा, दुकानाचे फलक, बांधकाम साहित्य, आणि अवास्तव लावलेल्या मोटारसायकल या मुळे जाणारे येणारे लोकांना तचेस वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच मागील काळात अपघात झालेले आहेत, याला आला घालण्यासाठी बदनापूर नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी विशाल पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, नगराध्यक्ष वैशाली जऱ्हाड, बदनापूरचे नगराध्यक्ष वैशाली जऱ्हाड आणि नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन रोडवरील सर्व अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सहा अतिक्रमित लोकांवर रस्त्यात वाहतुकीस अडथळा केला बाबत गुन्हे दाखल केले आहे.
दरम्यान, यापुढे महामार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी मोकळ्या ठेवाव्यात. या महामार्गावर एखादा अपघात झाला आणि तो अपघात अतिक्रमणामुळे झाल्याचे समजल्यास त्या अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला जाईल. असे पोलिस निरीक्षक सुरवसे यांनी सांगितले आहे.